Sunday, December 29, 2013

चेतन

खुर्चीतून उठलेली गीता परत खुर्चीत बसली.  खोलीवरून अजूनही तिची नजर फिरत होती.  एखाद्या तर्‍हेवाईक गर्भश्रीमंत तरुणाने लहरीप्रमाणे सजवलेली खोली - एवढंच त्या खोलीबद्दल म्हणता आलं असतं आणि मग तिचं लक्ष तिच्या समोरच एका खुर्चीत आरामात बसलेल्या चेतनकडे गेलं.  त्याने नुकतीच शिलगावलेली सिगारेट त्याच्या हातात होती आणि त्या धुरातून तो तिच्याकडे किंचित मिश्कील नजरेने पाहात होता.  तो श्रीमंत असेल, पण तर्‍हेवाईक? लहरी? मुळीच नाही !  पण वेगळा होता - तिच्या परिचयातल्या तरुणांहून किती वेगळा होता! आताचं त्याचं गुलहौशी रूप फसवं होतं.  त्याच्यातलं परिवर्तन तिने आपल्या स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं होतं नाहीतर तिचा विश्वासच बसला नसता - रात्री त्या गुंडांच्या अड्ड्यात पोहोचताच चेतन त्याच्या खर्‍या स्वरूपात प्रकट झाला होता.  मेंढ्यांच्या कळपात शिरलेल्या चित्त्याने त्यांची दाणादाण उडवावी तसा त्याने त्या वाड्यात हाहाकार माजवला होता.  तिनं ऐकलेलं खरं असलं तर दोघांना त्याने समुद्रात बुडवून मारलं होतं, एकाला चाकूने, आणखी एकाला विजेच्या कुंपणावर फेकून, तर मुक्रानला चाबकाने फोडून आणि रसूलला गळफास लावून ठार मारलं होतं.  बालिश चेहर्‍याच्या, मध्यम शरीरयष्टीच्या या चेतनमध्ये ही धुमसती शक्ती आली होती? आताचाही त्याचा स्वस्थपणा फसवा होता - त्याच्या सान्निध्यात सर्व वस्तूंना, सर्व प्रसंगांना, सर्व शब्दांना एक नवा अर्थ येत होता, एक नवा उजाळा लाभत होता.  
"कसला एवढा गंभीर विचार?" चेतन हसत म्हणाला.
"मला तुमचं नवल वाटतं, चेतन-" गीता प्रांजळपणे म्हणाली.
"तू काही नवल करणारी पहिलीच नाहीस." तो अर्धवट थट्टेने म्हणाला.
"मी तुम्हाला एक विचारू?"
"अवश्य".
"तुम्ही अनेकांचा बळी घेतलात--"
"संरक्षणासाठी! नाहीतर त्यांनी माझा बळी घेतला असता!"
"मी समर्थन मागत नाही.  मला माहीत आहे ती सर्व माणसं कोणत्या लायकीची होती ते-- त्यांना केवळ मृत्यू हीच शिक्षा योग्य होती.  माझा प्रश्न वेगळाच आहे.  अनेकांना अशा गुन्हेगारांचा संताप येतो.  पण तुम्ही त्यांच्या पुढे जाता--कायदा गुंडाळून ठेवता-- हे कसं?"
"गीता, केवळ तूच विचारते आहेस म्हणून मी या प्रश्नाचे उत्तर देतो, कारण तू सर्व कसोट्यांना उतरली आहेस.  कधी काळी मी जर स्त्री साथीदार निवडली असती तर ती तुझ्यासारखीच असती तेव्हा तुला प्रश्न विचारण्याचा आणि त्याचे उत्तर मिळण्याचा हक्क आहे."
काही वेळ चेतन खिडकीबाहेर पाहात बसला.
"गीता, हे मी आजवर कुणापाशीही बोललो नाही.  माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी मला एक भयंकर अनुभव आला.  तो काय हे मी सांगत बसत नाही.  एवढं सांगतो की त्या अनुभवाने माझे डोळे उघडले.  तथाकथित कायदा व कायद्याचा न्याय किती अपुरा आहे हे मला समजलं.  हेही कळलं की असे अनेक गुन्हे आहेत की जे कायद्याच्या कक्षेत येतच नाहीत.  अन्याय ज्याच्यावर झालेला आहे अशा माणसाला दाद मागायची सुद्धा काही सोय नाही.  कदाचित सुधारलेल्या समाजाची ती एक खूण असेल-- पण सर्वच माणसे सुधारलेली नसतात.  काही माणसे समाजाच्या या सैल किंवा चूकीच्या नियंत्रणाचा गैरफायदा घेतात.  समाजातल्या पापभिरू, असहाय्य, सज्जन, दुबळ्या अशा घटकांवर आपली उपजीविका करतात."  लोकांनी कष्टाने पैसा पैसा जमवून उभी केलेली संपत्ती लुटतात.  अशा दुर्दैवी लोकांना वाली नाही.  समाज केवळ हळहळतो, प्रत्यक्ष काही करत नाही.  मलाही हा अनुभव आला.. ते संस्कारक्षम वय म्हणा, माझा स्वभाव म्हणा किंवा माझ्यावर झालेल्या अन्यायाचं खास राक्षसी रूप म्हणा-- कशाचा तरी परिणाम होऊन माझ्या मनाची घडण आमूलाग्र बदलली--"
"गुन्हेगारांविरुद्ध  नुसतं संतापून उपयोग नव्हता.  त्यांच्या मागे पैशांचं बळ होतं, समव्यवसायी लोकांची संघटना होती.  त्यांना धडा शिकवायचा तर मला मला त्यांच्यापेक्षा जास्त क्रूर, जास्त हिकमती, जास्त कुशल व्हायलं हवं होतं आणि माझ्या आयुष्याची अनेक वर्षे ही तांत्रिक कौशल्ये हस्तगत करण्यात घालवली आहेत-मीही साधा माणूसच आहे- पण सतत सरावाने आणि चिकाटीने मी अनेक तंत्रे हस्तगत केली आहेत पण जरा विचार केला तर समजेल की त्यात खरोखर अशक्य काय आहे?"
"पिस्तूल, रायफल, तलवार, जंबिया, चाकू, तीरकमठा ही शस्त्रे मी चांगली वापरतो.  सर्व गाड्या, सर्व दुचाकी-तिचाकीही वाहने, काही जातीची विमानं मी चालवू शकतो.  कुस्त्यांचे शास्त्रीय व अशास्त्रीय सर्व प्रकार मी जाणतो.  मी चांगले वेषांतर करतो, इतरांच्या आवाजाची सहीसही नक्कल मी करू शकतो, इतरांच्या हस्ताक्षराची नक्कल मी करू शकतो- माझे शरीर इतके काटक आहे, चपळ आहे.  पण या सर्वात दैवी किंवा अमानवी असं काय आहे? मी आयुष्याचा जो एक मार्ग निवडला त्यासाठी ही साधनं आवश्यक होती त्याखेरीज मी यशस्वी झालो नसतो."
"पूर्वी असा एक काळ होता की व्यक्तिगत अन्यायाला किंवा अपराधाला व्यक्तिगतच जवाब द्यावा लागे.  व्यक्तिच्या सुखाची, सुरक्षिततेची, सन्मानाची हमी द्यायला समाजच संघटित नव्हता.  माणसाला स्वत:पुरता कायदा करावा लागे आणि मनगटाच्या बळावर तो अंमलात आणावा लागे.  असं समज की माझ्यापुरता मी त्या युगात वावरतो.  या कल्पना इतरांना कदाचित कालबाह्य, जुनाट, बुरसटलेल्या, बेजबाबदार वाटतील.  पण मला नाही! माझ्या आयुष्याला काही अर्थ असला तर तोच आहे! माझ्या डोळ्यापुढे काही आदर्श असला, काही ध्येय असलं तर तेच आहे!"
आणि मग चेतन हसत एकदम उभा राहिला.
"केवढ मोठं व्याख्यान !" तो हसत म्हणाला, "तो बघ शंभू. जेवण तयार आहे  म्हणून सांगायला आला आहे- चल!" 
गीता सावकाश उठली.
चेतनचा गंभीरपणा मगाशीच गेला होता. जेवताना त्याची सारखी बडबड चालली होती.  त्या शभूवर, घोरपड्यांवर टीका होती.  इतरही अनेक असंबद्ध विधानं होती.  पण गीता आता जाणून होती की हे सर्व वरवरचं आहे- आत खोलवर, एक साहसाची ज्योत धगधगत आहे- आणि शेवटी तिने धीर धरून मनातला खरा प्रश्न विचारला.
"चेतन, परवाच्या अनुभवानंतर रोजचं आयुष्य किती नीरस वाटतं!"
चेतन एकदम स्तब्ध झाला होता.  
"चेतन, तुम्हाला राग आला?"
"नाही, गीता.  राग नाही आला."  चेतन गंभीर आवाजात म्हणाला, "मी मघाशीच सांगितले.  एखादी स्त्री साथीदार हवी असती तर मी तुझ्यासारखीच एखादी निवडली असती-- पण गीता, मी जो मार्ग स्वीकारला आहे तो सर्व परिणामांचा विचार करून मगच निवडला आहे.  सर्व परिणाम भोगायची तयारी ठेवूनच या वाटेवर पाऊल टाकलं आहे.  मृत्यू हा माझा कायमचा साथीदार आहे, तो माझ्यापासून हाकेच्या अंतरावर सतत वावरत असतो.  जीवनाच्या क्षणाक्षणात जी धुंदी येते ती मृत्यूच्या सान्निध्यानेच येते.  एक पाऊल चुकलं, एक अंदाज खोटा ठरला, कटप्रतिकटातील एक चाल जरी वाकडी पडली तरी सर्व खेळ खलास !  मृत्यूला क्षणाक्षणाला हुलकावणी देऊन, त्याच्या जबड्यातून खेचून आणलेला आयुष्याचा प्रत्येक क्षण जणू सुवर्णाचा बनून येतो- पण हे सर्व माझ्यापुरतंच मर्यादित आहे- इतर कोणाला असा धोका पत्करायला सांगायचा मला कोणता हक्क आहे?"
"आणि इतर कोणी स्वखुशीने तयार झालं तर?"
चेतन बराच वेळ तिच्याकडे पाहात राहिला, आणि मग हसत म्हणाला,
"पाहू! पाहू! तशी वेळ आली तर तुलाही ती साद येईल!"
"चेतन, हे वचन समजू का?"
"हो! तशी वेळ आली तर तेही होईल!"
आणि मग गीतासाठी ते साधं जेवण राहिलं नाही.
त्याच्या सहवासात गीता सर्व काही विसरली होती.  चारचे ठोके कानावर येताच तिचं रोजचं सर्व आयुष्य चारी बाजुंनी तिच्याभोवती जमा झालं  चेतनचा निरोप घेण्यासाठी ती उठली.  तिचा हात चेतनने हाती घेतला, काही क्षण तसाच ठेवला, आणि मग किंचित दाबून सोडला.
"पुन्हा भेट होईपर्यंत नमस्कार, गीता!" तो म्हणाला.
"पुन्हा भेट होईपर्यंत!" गीता हसत म्हणाली व बाहेर पडली


चेतन (लेखक -  नारायण धारप)
पृष्ठे - १६८ 
मूल्य रूपये १६०/-
समन्वय प्रकाशन / अजब डिस्ट्रिब्युटर्स, कोल्हापूर



  

No comments:

Post a Comment